शिवसेना-राष्ट्रवादीत कलगीतुरा; गुलाबरावांनी ‘डाकू’ म्हणताच नाथाभाऊ त्यांना म्हणाले ‘चोर’
झूम मराठी वृत्त
जळगाव : एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून चिखलफेक सुरू असताना महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्र्वादीचे नेतेही एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील हे खडसेंना डाकू म्हणाले तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून खडसे यांनी गुलाबरावांना चोर म्हणाले.
अहमदनगर येथे दोनच दिवसांपूर्वी एक कार्यक्रम पार पडला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांवरही जोरदार टीकास्त्र सोडले. या टीकेने इतक्या खालचा स्तर गाठला की, गुलाबराव पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. आमच्या जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्यासारखा डाकू बसला आहे.
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेबद्दल माध्यमांनी एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गुलाब पाटील उच्चशिक्षित आहेत. ते निर्व्यसनी आणि कार्यतत्पर मंत्री आहेत. मात्र, ते एकनाथ खडसे हे आमच्या जिल्ह्यात डाकू आहेत, असे म्हणतात. मला वाटते, अशा निर्व्यसनी माणसाविरुद्ध न बोललेले बरे. ‘चोरो को सारे नजर आते है चोर’ असे एकच वाक्य म्हणत त्यांनी गुलाबरावांवर टीका केली.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी खडसेंना डाकू म्हटल्यामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यापूर्वीही गुलाबराव पाटलांनी खडसे यांच्यावर वारंवार खालच्या स्तरावर टीका केली. एकीकडे ते घटकपक्षातील नेत्यांवर सभ्यता सोडून टीका करतात. मात्र, भाजपपुढे लोटांगण घालतात. त्यामुळे गुलाबराव पाटलांविरोधात आंदोलन छेडू, असा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे.


