ठाण्यातील मॉलमधील मारहाणप्रकरणी, आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक..
ठाणे : ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद करण्यासाठी गेल्यानंतर विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात त्यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौकशीही केली जाणार आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्वतः एकापाठोपाठ दोन ते तीन ट्विट करून माहिती दिली आहे.
हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 11, 2022
आमदार जितेंद्र आव्हाड पहिल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाही तर तुम्ही पोलीस स्टेशनला, या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटले की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले, मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवले. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करू शकत नाही. वरून आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. हा पोलीस बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल; परंतु मी जे केले नाही तो गुन्हा मी कबूल करणार नाही, असे आव्हाड म्हणाले. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत प्रेक्षकाची झटापट झाली होती. एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत होते. त्यानंतर आव्हाड यांच्यावर टीका झाली. आता या प्रकरणात आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे.


