अंबरनाथमध्ये खळबळ : एका तरुणीवर तीन मित्रांनी केला सामुहिक बलात्कार
तरुणीने तक्रार केल्यावर या तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
झूम मराठी वृत्तसेवा
अंबरनाथ : राज्यात बलात्काराचे सत्र अद्यापही सुरूच आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सामूहिक बलात्कारासारखी घटना समोर आली आहे. अंबरनाथ शहरात आज एक सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीवर तिच्याच तीन मित्रानी बलात्कार केला आहे. या घटनेची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक परिसरात असलेल्या जीआयपी धरण परिसरात हि घटना घडली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी या परिसरात असणाऱ्या रेल्वेच्या ग्रेट इंडियन पेनिनसुला धरणाच्या परिसरात हि तरुणी आपल्या तीन मित्रांसोबत फिरायला गेली होती. त्यावेळी या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार या तरुणीने केली आहे.
तरुणीने तक्रार केल्यावर या तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. २५ ते ३० या वयोगटातील हे आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाजीनगर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे



