महाराष्ट्र

हमाली करून वडीलांनी पुरवला खुराक, आज एका चुकीने भंगले महाराष्ट्र केसरीचे स्वप्न; अन्याय झाला असा..

कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा 'सिकंदर



झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

पुण्यात ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चीतपट करून विजयी झाला. माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड हा सिकंदर शेख याला पराभूत करून अंतिम फेरीत पोहचला होता. दरम्यान सेमीफायनलमध्ये सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील लढत चर्चेत आली आहे. यामध्ये सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याची भावना अनेकांनी सोशल मीडियात व्यक्त केली आहे. झाले असे कि महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील टागं हा डाव व्यवस्थीत झाला नव्हता सिकंदर डेन्जर पोझिशनला नव्हता पण महेंद्रला चार गुण दिले गेले. अनेकांनी हा निर्णय चुकल्याचे बोललं आहे. जर हा निर्णय बरोबर दिला असता तर सिकंदर शेख विजयी झाला असता असं अनेकांनी म्हंटलं आहे. पण शेवटी पंचाचा निर्णय अंतिम असतो. दरम्यान बघूया सिकंदर शेख याचा झंझावती जीवनप्रवास..

घरात असणाऱ्या अठराविश्‍वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव म्हणजे सिकंदर शेख. सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगतेय. या स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत सिंकदरने सर्वांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक प्रतिस्पर्धी मल्लांला त्याने आस्मान दाखवत देशातील आघाडीचा मल्ल तो बनला आहे.

हमाली करून वडीलांनी पुरवला खुराक

सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे. निमगावच्या मगरांच्या तालमीत सरावाला असताना तालीमीची स्वच्छता करायची आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील, तो खायचा आणि सराव करायचा. असं सुरू असतानाच वडीलांची प्रकृती खालावली म्हणून रशीद घरी परतले आणि लग्नगाठ बांधली गेली. संसाराचा गाडा हाकत असतानाच दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत कायमचीच झाली. मात्र तेंव्हाही कुस्ती सोबतीला होती. पुन्हा कुस्ती लढायला त्यांनी सुरवात केली.

हमालीने थकलेलं शरीर सावरत आखाड्यात उतरले वडील

कुस्तीत जिंकलेल्या इनामावर जगणं सुरू होते. त्यात संसारवेलीवर हुसेन आणि सिंकदर ही दोन फुले उमलली आणि मिळणाऱ्या बक्षीसांच्या रकमेवर चार जणांचे पोट भागेनासे झाले. त्यात त्यांनी स्थानिक मार्केट यार्डात हमालीचा पर्याय निवडला. दिवसभर हमाली करायचे, घाम गाळायचा पण कुस्तीची नशा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या लहानग्या मुलांना घेऊन आखाड्यात जाऊ लागले. हमालीने थकलेलं शरीर सावरत आखाड्यात उतरून मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागले. सोबतीला वस्ताद चंदु काळेंचे मार्गदर्शनही मिळत होते.

भावाने वडिलांच्या हमालीचे ओझे घेतले पाठीवर

सिकंदर अलीकडे चांगल्या कुस्त्या मारू लागला होता. चार पैसेही घरात येऊ लागले. त्यात सिंकदरच्या वडीलांना आजाराने गाठले आणि त्यांची हमाली थांबली. खुराकाला लागणाऱ्या पैशांची चणचण जाणवू लागली. हा प्रसंग येताच मोठा भाऊ हुसेनने आपली कुस्ती थांबवत वडीलाच्या हमालीचे ओझे आपल्या खांद्यावर घेतले. सिंकदर वडीलांचे स्वप्न उराशी बाळगुन कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवू लागला. वस्ताद विश्‍वास हारूगले यांच्या मार्गदर्शनात तो एकेक डावपेच शिकु लागला. गावाकडून भावासोबत रमेश बारसकर, बाळू चौवरे यांच्याकडून आर्थिक पाठबळ मिळत होते. यातूनच सिंकदरने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अनेक अनुभवी मल्लांना चितपट करण्याची किमया सिकंदरने साधली. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिंकदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती पटावर चमकत आहे.

वडिलांचे स्वप्न पुर्ण.

आपल्या वडीलांच्या, भावाच्या पाठीवर असलेले हमालीचे ओझे कमी व्हावे, घरातले दारिद्र हटावे यासाठी रक्ताचे पाणी करणारा सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. सैन्यदलाकडून खेळत तो अनेक मैदाने जिंकत आहे. आपला मुलगा मोठा मल्ल बनावा ही वडीलांची इच्छा त्याने पुर्ण केली आहे.

सिकंदर बक्षिसांनी बनला श्रीमंत….

आता पर्यंत देशभरात कुस्त्या लढून सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीएस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे