बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद, महिला डॉक्टरसह पाच जणांचा समावेश
संशयित महिला डॉक्टर, तिचे पती बनावट नोटांसाठी ग्राहक शोधत होते. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे लासलगाव पोलिसांनी बनावट नोटा देणारे आणि घेणाऱ्यांना ताब्यात घेतले.
निलेश पाटील
नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यानंतर अन्य ठिकाणीही बनावट नोटा व्यवहारात आणण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. लासलगाव पोलिसांनी असाच एक प्रकार उजेडात आणला. २५ हजारांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याची तयारी दर्शवत बनावट नोटा व्यवहारात आणणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी एका महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख ४५ हजाराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
संशयित महिला डॉक्टर, तिचे पती बनावट नोटांसाठी ग्राहक शोधत होते. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे लासलगाव पोलिसांनी बनावट नोटा देणारे आणि घेणाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी मंगळवारी लासलगाव येथील मोहन पाटील, त्यांची पत्नी डॉ. प्रतिभा घायाळ (दोन्ही रा. बोराडे रुग्णालय जवळ) आणि विठ्ठल नाबरिया (कृषिनगर, कोटमगाव रस्ता) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा संशयितांचा मित्र रवीद्र राऊत (स्मारकनगर, पेठ), विनोद पटेल (चाणक्य इमारत, सूर्यवंशी रस्ता, पंचवटी, नाशिक) हे सायंकाळी ५०० रुपयांच्या बनावट नोटा देणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले.
या पथकाने येवला रस्त्यावरील विंचुर येथे सापळा रचला. संशयितांना बनावट नोटा देण्यासाठी इटीऑस मोटारीतून आलेल्या रवींद्र राऊत आणि विनोद पटेल यांना पकडण्यात आले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा