धुळे बँकेत पहिल्यांदाच शिवसेनेच्या गटाच्या चार संचालकांची एंट्री!
बॅंकेचे व्यवस्थाप सुरळीत ठेवण्यासाठी शिवसेनेचे हे चार संचालक प्रयत्नशील असल्याचे मत शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले.
धुळे-नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेच्या चार संचालकांनी एंट्री झाल्याने पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे . बॅंकेचे व्यवस्थाप सुरळीत ठेवण्यासाठी शिवसेनेचे हे चार संचालक प्रयत्नशील असल्याचे मत शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले.
धुळे-नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झाले. सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणूक होण्याआगोदरच शिवसेनेचे आमशा पाडवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी झालेल्या मतदानातून स्वतः चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शरद पाटील, धडगावचे संदीप वळवी हे विजयी झाले.
शिवसेनेने या संचालकांच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेत आपली पकड मजबूत केली आहे. यासमोर आता महाविकास आघाडीचा धर्म आघाडीतील पक्षांनी पाळला तर आघाडीकडे बॅंकेचे सूत्रे जाऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आघाडी धर्म न पाळता काँग्रेसने जर भाजपला पाठिंबा दिला तर बॅंकेची सूत्रे भाजपच्या हातात जाऊ शकतील. मात्र शिवसेनेचे चार संचालक बॅंकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी नक्कीच महत्त्वाची जबाबदारी पार पडतील, असे रघुवंशी म्हणाले. तसेच धुळे-नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे विभाजन होऊन नंदूरबार जिल्हा स्वतंत्र बॅंक निर्माण करण्याची मागणी यापूर्वी त्यांनी केली आहे.



