केंद्राचा 1 लाख टन कांदा बाजारात: केंद्राच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!!
दिलीप जय परदेशी, संपादक झूम मराठी न्यूज
पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता पन्नाशी ओलांडलेल्या कांद्याचा भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी बफर स्टॉकमधला १ लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी कांद्याचे दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले होते. सध्या कांदा ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. केंद्राचा बफर स्टॉकमधला कांदा बाजारात आल्याने कांदा अजून स्वस्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, तर सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे
सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आपला मोर्चा आता शेती उत्पादनाकडे वळवला आहे. कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी आता केंद्र सरकार साठवणुकीतला कांदा बाहेर काढणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर कमीत कमी ५ ते ७ रुपयांनी कमी होणार आहेत. एकीकडे पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
कांद्याच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता, पण आता या निर्णयामुळे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. १३ ऑक्टोबरला कांद्याला ४३ रुपये किलोचा दर नाशिकच्या बाजारपेठेत मिळाला होता. यंदा पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे कांदा चाळीत साठलेल्या कांद्याला अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हा कांदा विक्रीसाठी काढला होता. मात्र गेल्या महिनाभरात पुन्हा कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. ४३०० वर गेलेला कांदा आता २ हजार रुपये क्विंटलवर येऊन ठेपलेला आहे.




