अध्यात्मिक व्यासपीठावर पोहोचला सायबर सुरक्षेचा संदेश; ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती

जळगाव : अध्यात्मिक वातावरणासोबतच डिजिटल सुरक्षेची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, जळगाव येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि डिजिटल व्यवहारातील सतर्कतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सोमनाथ वडनेर यांच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमाला मीनाक्षी दीदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. क्वीक हिल फौंडेशन च्या सायबर वॉरियर्स उपक्रमातील साक्षी पाटिल, विद्या सोनवणे, अक्षय पाटिल आणि लोकेश पाटिल यांनी उपस्थितांना ऑनलाइन फसवणूक, OTP, सायबर जाळे, फिसिंग, फेक लिंक, पासवर्ड सुरक्षा आणि सोशल मीडिया सेफ्टी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान काही उपस्थितांनी स्वतःसोबत घडलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांचे अनुभव सांगत विविध प्रश्न उपस्थित केले. सायबर वॉरियर्स यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करत अशा प्रसंगी तातडीने कोणती पावले उचलावीत, कोणती खबरदारी घ्यावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यात्मिक विचारांसोबतच काळाची गरज ओळखून डिजिटल सुरक्षेचा संदेश देणारा हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ठरला. तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना ‘सजग नागरिक, सुरक्षित डिजिटल व्यवहार’ हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.



