जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ एप्रिलपासुन विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. या काळात कोणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये. याकरीता शससनाने राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील गरजूंना चांगलाच फायदा झाला असून निर्बंध काळात जिल्ह्यात ९४ हजार ८५७ लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली.
जिल्ह्यासाठी ७०० थाळ्यांचे उद्दिष्ट शासनाकडून देणेत आले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये हा इष्टांक दुप्पट म्हणजेच १४०० थाळी इतका करण्यात आला. शासनाच्या २६ मार्च, २०२० च्या परिपत्रकानुसार तालुका स्तरावर शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात येऊन जिल्ह्याचा इष्टांक ३ हजार ५०० थाळींपर्यंत वाढविण्यात आला. शासनाने टप्प्याटप्प्याने उद्दिष्टाबरोबरच क्षेत्राचा देखील विस्तार करून ही योजना तालुकास्तरावर कार्यान्वित केली.
सद्यस्थितीत एकूण ३८ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. शहरी भागात १६ व ग्रामीण भागात २२ केंद्र आहेत. शहरी भागात १६ केंद्रामधून १ हजार २५० थाळ्या तसेच ग्रामीण भागात २२ केंद्रामधून २ हजार १७५ थाळ्या वितरीत करण्यात येतात. शिवभोजन ॲपवर प्रत्येक लाभार्थ्याचा फोटो व लाभार्थ्याचे पुर्ण नांव याची नोंद घेण्यात येते. लाभार्थ्यांना वरण, भात, एक भाजी आणि दोन चपाती एका थाळीमध्ये देण्यात येत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा