दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, उपचारास उशीर झाल्याने या महिलेला आपला जीव गमवावा लागला..
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेची प्रसूती करण्यास नकार दिला. १० लाख द्या तरच उपचार करु असं सांगितलं. अखेर उपचारास उशीर झाल्याने या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. जुळ्या बाळांना जन्म देऊन या महिलेने डोळे मिटले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक भयंकर घटना घडली. माणुसकीला मान खाली घालायला लावणाऱ्या या घटनेत नुकतंच या जगात पाऊल ठेवलेल्या दोन चिमुरड्या जीवांनी आपली आई गमावली आहे. हे सारं झालं ते फक्त आणि फक्त पैशांसाठी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एक आई आपल्या लेकरांना या जगात एकटं सोडून कायमची निघून गेली. वेळेत उपचार न मिळाल्याने जीव मगावलेली ही महिला एका भाजप आमदाराच्या पीएची पत्नी होती. जर, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य माणसांनी कुठे जावं, हा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे समोर आला आहे.
भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या गर्भवती होत्या. त्यांना प्रसूती वेदना होत असल्याने त्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या होत्या. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना तपासलं तेव्हा त्यांच्या गर्भात जुळी मुलं असल्याचं दिसून आलं. त्यांची सिजेरियन पद्धतीने प्रसूती करावी लागणार असून त्यासाठी २० लाख रुपये खर्च येईल असं त्यांना सांगण्यात आलं. तसेच, आता ऍडव्हान्स दहा लाख रुपये भरा, असं हॉस्पिटल प्रशासनाने भिसे यांना सांगितलं. मात्र, तेव्हा जवळ दोन ते तीन लाख होते. आता इतके भरतो तुम्ही डिलीव्हरी करा बाकीचे मग देतो, असं सांगितल्यावरही रुग्णालय प्रशासनाने ऐकलं नाही.
तनिषा भिसे यांच्या नणंद प्रियांका पाटे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने कशाप्रकारे मुजोरी केली, याबाबत सकाळला सांगितलं आहे. २८ मार्चला वहिनी तनिषा भिसेला रक्तस्त्राव होत असल्याने दीनानाथमध्ये नेलं होतं. तिथे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला २० लाख रुपये भरावे लागतील. जर, तुमची ऐपत नसेल तर ससून रुग्णालयात जा, असा सल्लाही रुग्णालय प्रशासनाने त्यांना दिला. यादरम्यान तनिषा यांना खूप टेन्शन आलं आणि त्यांचा बीपी वाढला. त्यानंतर त्यांना ओपीडीमध्ये शिफ्ट केलं, २ तास त्यांना तिथेच ठेवलं. यादरम्यान एकही डॉक्टर त्यांना बघायला आला नाही.



