गावे, वस्त्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार ! : जिल्हाधिकार्यांचे निर्देश
जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता जिल्ह्यातील गावे, वस्त्या आणि रस्त्यांची जातीवाचक असणारी नावे बदलण्यात येणार आहेत. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

याबाबत वृत्त असे की राज्यातील शहरात व ग्रामीण भागात गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलून अशा सर्व गावांना, वस्त्यांना व रस्त्यांना महापुरूषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नांवे देण्याबाबतचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ११ डिसेंबर, २०२० रोजी निर्गमित केला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ६ मे, २०२१ च्या निर्णयान्वये जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समितीची स्थापना केली असून जळगाव जिल्हास्तरीय समितीची पहिली बैठक अलीकडेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली.
या बैठकीस समितीचे सदस्य तथा जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिका/नगरपंचायत/नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्यासह सदस्य सचिव तथा समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील हे ऑनलाईन उपस्थित होते.
सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दीगंत होण्याच्यादृष्टीने राज्यातील शहरात अथवा ग्रामीण भागात गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नांवे जातीवाचक असल्यास अशी नांवे बदलून त्याऐवजी महापुरूषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नांवे देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यातील अशी नांवे बदलून नवीन नांवे देण्याची कार्यवाही सर्व संबंधित यंत्रणांनी करुन याबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्यात यावी. पंचायत समिती, रावेर व भुसावळ यांचेकडून अशी माहिती प्राप्त झाली असून उर्वरित यंत्रणांची माहिती अप्राप्त असल्याचे समितीचे सदस्य सचिव श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.



