Amalner News | अंमळनेरच्या प्रताप हायस्कुल मुख्याध्यापिक यांचे दिव्यांग प्रमाणपत्र निघाले बोगस…!
प्रहार अपंग संघटना अमळनेरच्या माध्यमातून गंभीर प्रकार उघडकीस...
अंमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कुल मध्ये कार्यरत मुख्याध्यापिका सौ. प्रमोदिनी बळीराम पाटील हे बनावट एस डी एम प्रमाणपत्राच्या आधारे व्यवसायकर, आयकर अश्या अनेक योजनांचा लाभ घेत असलेबाबत प्रहार अपंग क्रांती संघटना तालुकाध्यक्ष योगेश पवार यांना तक्रार प्राप्त झाली होती.
सदर तक्रारीच्या आधारे योगेश पवार यांनी माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांचेकडेस संबंधित व्यक्तीचे प्रमाणपत्र पडताळणी होणेबाबत अर्ज सादर केला होता. त्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने माध्य.शिक्षण विभाग जळगांव यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव यांचेकडून अहवाल मागितला असता, सदर व्यक्तीचे दिव्यांग प्रमाणपत्र या कार्यालयाकडून देण्यात आलेले नाही, सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचा अभिप्राय नमूद केला आहे. सदर अहवाल प्रहार संघटनेला प्राप्त झाले असता, योगेश पवार यांनी तात्काळ माध्य.शिक्षण विभाग जळगांव यांचेकडेस संबंधित व्यक्तिविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार सदर तक्रारीनुसार कोणतीही कारवाई न करता खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर व माध्य. शिक्षण विभाग जि. प.जळगांव हे संगनमताने संबंधित मुख्याध्यापिका सौ. प्रमोदिनी बळीराम पाटील यांना अभयदान मिळवून देण्यासाठी पाठीशी घालत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. ज्या प्रताप हायस्कुल मध्ये परम पूज्य साने गुरुजींनी सेवा दिली त्याच जागेवर राहुन काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी मेवा खाण्यासाठी अक्षमापित कृत्य केलेले दिसून येत आहे. खान्देश शिक्षण मंडळ या बाबत दखल न घेण्याचे मूळ कारण काय असावे. यामागे संस्थेचे हाथ देखील काळे झाले असावे? अशी चर्चा देखील जिल्ह्यात सुरू आहे. सदर व्यक्तीवर शिक्षण विभाग व खान्देश शिक्षण मंडळ काय? कारवाई करणार की गप्प बसणार ? याकडे योगेश पवार यांनी जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.


