गुन्हेगारी

एनजीओ कार्यकर्ता, किरण गोसावी मूळचा चाळीसगावच्या पिलखोड गावचा रहिवासी

किरण गोसावी मूळचा ताे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातील पिलखोड गावचा रहिवासी असून सध्या नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी राहत असे.

ड्रग्ज प्रकरण:गोसावी बनला एनजीओ कार्यकर्ता, फरार झाल्यानंतर सचिन पाटील हे नाव केले धारण

मुंबई एनसीबीच्या ड्रग्ज कारवाईतील पंच किरण गाेसावी हा नाेकरीच्या निमित्ताने फसवणूक करणारा आराेपी असून मागील दाेन वर्षांपासून ताे फरार हाेता. यादरम्यानच्या काळात किरण गाेसावी याने सचिन पाटील हे बनावट नाव धारण करून स्टाॅप क्राइम या स्वयंसेवी संस्थेचा (एनजीआे) कार्यकर्ता म्हणून देशभरात विविध ठिकाणी फिरला असल्याचे पाेलिस तपासात समाेर आल्याची माहिती पुणे पाेलिसांनी दिली आहे.

पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणाला मलेशियात नाेकरी लावण्याच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा किरण गाेसावी याच्यावर २०१८ मध्ये फरासखाना पाेलिस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणात गाेसावी पसार झाल्याने पाेलिसांनी मागील दाेन वर्षांपासून त्याला फरार घाेषित केले हाेते. फरार काळात मागील दहा दिवसांत गाेसावी लखनऊ, हैदराबाद, जळगाव, मुंबई, पनवेल, जबलपूर, लाेणावळा आदी ठिकाणी रेल्वेने फिरला आहे. रेल्वेचे बुकिंग तसेच लाॅजला राहण्यासाठी ताे सचिन पाटील या नावाचा वापर करत हाेता. सचिन साेनटक्के या नावाने त्याने सिमकार्ड घेतलेले हाेते आणि त्याआधारे ताे माेबाइलवर इतरांशी संपर्क साधत हाेता. मूळचा ताे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातील पिलखोड गावचा रहिवासी असून सध्या नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी राहत हाेता.

किरण गाेसावी याने अटक हाेण्यापूर्वी एक व्हिडिआे प्रसारित केला असून त्याने सांगितले की, माझ्यावर करण्यात आलेले आराेप खाेटे असून प्रभाकर साईल याच्यासह त्याच्या दाेन भावांचा सीडीआर रिपाेर्ट तपासला तर त्यातून कुणी किती पैसे घेतले, कुणाकुणाशी बाेलणे केले याबाबत सर्व माहिती उघडकीस येईल. प्रभाकर साईल जे आराेप करताे, एवढे पैसे घेतले, तेवढे पैसे घेतले; पण सॅम डिसुझासाेबत संभाषण कुणाचे झाले आहे, किती पैसे कुणी घेतले, प्रभाकर साईलला पाच दिवसांत काय आॅफर आल्या आहे हे त्याचे माेबाइलचा सीडीआर रिपाेर्ट काढल्यावर स्पष्ट हाेईल. माझा आयात-निर्यातीचा व्यवसाय असून ज्या वेळी प्रभाकर माझ्यासाेबत अंगरक्षक म्हणून फिरत हाेता त्या वेळचे आणि पूर्वीचे माेबाइल चॅट तपासावेत. दाेन तारखेनंतरचे त्याचे चॅट उघड कराव्यात, कुणाचे संभाषण त्याने डिलीट केले आहे ते पुन्हा मिळवून ते तपासावे इतकीच माझी विनंती आहे. मुंबई पाेलिसांनी त्याची केस हातात घेतली असेल तर प्रथम त्याच्यावर कारवाई करावी, काेणते मंत्री त्यांच्यामागे आहेत त्याची माहिती काढावी. मी मराठी व्यक्ती असल्यामुळे माझ्याकडे सत्ताधारी पक्षातील किंवा विराेधी पक्षातील मंत्र्यांनी उभे राहावे. मी जे सांगताे त्यावरून मुंबई पाेलिसांकडे अर्ज करावा. प्रभाकरचे फाेन रेकाॅर्ड तपासले तर ताे जे आराेप करत आहे, ते खाेटे असून त्याने व त्याच्या भावांनी पैसे घेतल्याचे उघडकीस येईल, असे सांगितले आहे.

दोन घटस्फोटांनंतर केले तिसरे लग्न

गोसावी याची तीन लग्ने झालेली असून पहिल्या दाेन पत्नींपासून विभक्त झाल्यानंतर ताे तिसऱ्या पत्नीसह वाशीत वास्तव्यास हाेता. बुधवारी रात्री ताे पुण्यातील कात्रज परिसरातील मांगडेवाडी भागात प्रसाद लाॅज या ठिकाणी आल्याची माहिती खंडणीविराेधी पथकाचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विनायक वेताळ, एपीआय संदीप बुवा, पाेलिस अंमलदार संजय भापकर यांना मिळाली हाेती. त्यानुसार गुरुवारी पहाटे तीन वाजता त्यास लाॅजमधून अटक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे