पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड..
पतीच्या मृत्यूनंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी पत्नीकडून साफ करुन घेतला बेड; मध्य प्रदेशातील संतापजनक प्रकार..
मध्य प्रदेशात दिंडोरीतून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पाच महिन्यांची गर्भवती महिलेकडून रक्ताने माखलेले रुग्णालयातील बेड साफ करुन घेण्यात आले. रामराज मारवी (२८) असे मृताचे नाव आहे. त्याची दोन भाऊ आणि वडिलांना जमिनीच्या वादातून हत्या केली. रामराजला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होचे. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूच्या दु:खात असलेल्या महिलेकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पती ज्या बेडवर उपचार घेत होता तो बेड साफ करुन घेतला.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोशनीच्या एका हातात रक्ताने माखलेलं कापड आहे आणि दुसऱ्या हाताने टिश्यू पेपरने बेड साफ करताना दिसत आहे. ही घटना गडसराय आरोग्य केंद्रात घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर आरोग्य विभागाप्रती लोकांचा रोष पाहायला मिळत आहे.
रुग्णालयाचे डॉक्टर चंद्रशेखर टेकम यांनी स्पष्टीकरण दिलं. कर्मचारी रुग्णालयात उपस्थित असल्याचे सांगितले. महिलेला बेड साफ करण्यास सांगितलं नाही. ते गुरुवारी जमिनीच्या वादात जखमी झालेल्या दोन लोकांना आमच्या केंद्रात आणण्यात आलं. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीनेच बेड पुसायचा असल्याचं सांगितलं. महिलेची किंवा तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही.



