Civil Hospital | पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील कारभार ‘राम भरोसे !
पाचोरा तालुक्यातील गोरगरीब, सामान्य रुग्णांना ग्रामीण रुग्णालय हा एकच आशेचा किरण असलेला व दुरावस्था अन् गैरसोयीसाठी कुपरिचित असलेल्या पाचोरा शासकीय ग्रामीण रुग्णालय गैरसोयीचे असल्याच्या रुग्णांच्या तक्रारींवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाला असून त्या गैरसोयीचे पुन्हा एकदा दर्शन दिसून आले.
रुग्णांची गैरसोय हे एकप्रकारे समीकरणच झाले आहे. मात्र, सरकारतर्फे जिल्हा रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्याच्या वल्गना केल्या जात असल्याने अन् देशभरातील तब्बल ७५ जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुंपातर केले जाणार असल्याने जिल्हा रुग्णालये कात टाकतील अशी सर्वसामान्यांची भावना आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीस पावसाळ्यात गळती लागल्याने कर्मचारी प्लॅस्टिक कागदाच्या खाली बसून कामकाज करीत आहेत. यामुळे महागडी वैद्यकीय उपकरणे व औषधीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. रुग्ण कमालीचे त्रस्त झाले असले तरी संबंधित अधिकारी मात्र सुस्त असल्याने समाजमनातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
या रुग्णालयात योग्य ती रुग्णसेवा मिळत नसल्याचे चित्र आहे, किरकोळ पावसामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीस गळती लागली आहे. त्याचा रुग्णांना प्रचंड त्रास व मनस्ताप सोसावा लागत असून, कर्मचाऱ्यांना देखील प्लॅस्टिक कागदाखाली बसून कामकाज करावे लागत आहे. इमारतीत गळती लागल्याने महागडी वैद्यकीय उपकरणे, औषधी यांच्या नुकसानीची भीती व्यक्त होत आहे.
या रुग्णालयातील पलंग, स्ट्रेचर, याशिवाय रुग्णांसाठी आवश्यक साहित्य सामग्री तुटली आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील व पायरीवरील फरशा तुटल्या असून, गंभीर रुग्णांची ने-आण करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. येथील नेत्र, दंत, एक्स-रे यासारखे विभाग अजूनही कुलूप बंद आहेत. कारण त्या विभागासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत. पुरेसा आरोग्यसेवक कर्मचारी नाही. त्यामुळे लोकांना योग्य ती सेवा मिळत नसल्याने बहुतांश रुग्णांना जळगाव शासकीय रुग्णालयात हलविले जाते. अथवा रुग्णांना खासगी रुग्णालयात पैसा खर्च करून उपचार घ्यावे लागतात.
या रुग्णालयात पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी नियुक्त करावेत, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिसरात घाण, दुर्गंधीचा उपद्रव होत असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण रुग्णालयात ‘ओपीडी’साठी तीन डॉक्टर नियुक्त असले तरी ते वेळेवर हजर नसतात, अशाही तक्रारी होत असल्याने या रुग्णालयाची दुरवस्था व असुविधांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी रास्त अपेक्षा रुग्ण व त्यांच्या नातलगांकडून व्यक्त होत आहे.
- निधीचा विनियोग कसा?
शासकीय जिल्हा रुग्णालयातील देखभाल, दुरुस्तीसाठी तसेच इतर उपाययोजनांसाठी शासनाकडून भरघोस निधी दिला जातो. मात्र, या निधीचा योग्य विनियोग होतो काय? हा खरा प्रश्न आहे. शासनाकडून निधी दिला जात असतानाही पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील सोयीसुविधांवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याने, या निधीचा नेमका विनियोग कसा केला जातो? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



