पाचोऱ्यात रक्तदान दिना निमित्ताने रक्तदान शिबीर
पाचोरा, प्रतिनिधी । येथील संभाजी महाराज चौकात जागतिक रक्तदान दिन व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व कोरोना योद्धे व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.
जागतिक रक्तदान दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे आयोजित रक्तदान शिबिरे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे म्हणाले की, कुठलाही वाजागाजा न करता जे सामाजिक कार्य माणुसकी समुहातर्फे तुम्ही करत आहे. ते खुप वाखाणण्याजोगे आहे. बँड, डि. जे. पार्टी, वाढदिवसावर होणारा फालतु खर्च टाळून जर प्रत्येकाने सामाजिक कार्यात हातभार लावला तर निश्चितच गोरगरिबांना फायदा होईल. या रक्तदान शिबिरात सुमित पंडित, गजानन क्षीरसागर, सचिन पाटील, गुलफाम शेख, रविंद्र सुतार, आत्माराम भगत, विजय कोळी आदींनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावणे यांनी जागतिक रक्तदानाविषयी जनजागृती करून लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. यावेळी ११ समाजसेवक व कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यात ११ डाॅक्टर, पोलिस, सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. लाॉक डाऊनच्या कालावधीमध्ये ज्यांनी गोरगरिबांना एक पाऊल पुढे येऊन मदत केली होती अशा सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांचा कोरोना योद्धा सन्मान सोहळा भारत काकडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.


