ब्रेकिंग

पुण्यात शिवसैनिकांकडून किरीट सोमय्यांवर हल्ला; जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल

पुणे : जंबो कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या पुण्यात आले आहेत. दरम्यान, सोमय्या आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार केली. तिथून महापालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी ते आले. आयुक्तांची भेट घेतल्यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सोमय्या गाडीकडे पळत असताना झालेल्या धक्काबुक्कीत ते पायऱ्यांवर पडले. या सर्व घटनेत सोमय्या जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमय्या महापालिकेतून निघत असताना शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. इतकंच नाही तर काही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे सोमय्या हे गाडीकडे पळत सुटले. मात्र शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की करत पायऱ्यांवर पाडले. पोलिसांनी किरीट सोमय्या यांना गाडीत बसवल्यानंतरही आक्रमक शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवरही हल्ला चढवला. काही कार्यकर्ते गाडीच्या समोर आले, तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूने हल्ला केला.

दरम्यान, शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी एक ट्विट  केलं आहे. पुणे महापालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असं ट्विट   सोमय्या यांनी केलं आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. मुद्दे संपले की माणसं गुद्यावर येतात. पायाखालची वाळू घसरली की सभ्यतेचा बुरखा फाटून मूळ चेहरा समोर येतो. किरीट सोमय्या घाबरणाऱ्यांमधले नाहीत. त्यांचा प्रकरणे काढण्याचा इतिहास आहे. अनेकांना त्यांनी घरी पाठवलं आहे. अख्खे महाराष्ट्राचे सरकार भाजपच्या कार्यकर्त्यांना गावोगावी त्रास देत आहे. जर सोमय्या आरोप करत असतील तर ते खोटे आहेत हे सिद्ध करून दाखवा, घोषणाबाजी आणि अंगावर धावून काय येता? असा खोचक सवाल पाटील यांनी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे