धुळे : विविध उपाययोजना राबवूही कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याने राज्य सरकारने सकाळी सात ते अकरापर्यंत निर्बंध शिथिल करत नंतर संचारबंदीसह कठोर लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील मोठा पूल वगळता इतर सर्व पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (ता. २३) घेतला. यात केवळ अत्यावश्यक सेवा व संबंधित कर्मचाऱ्यांना तैनात पोलिसांच्या संमतीनेच ये- जा करता येईल.
वारंवार आवाहन करूनही असंख्य नागरिक निरनिराळ्या नियमांचा भंग करत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्याचा वैद्यकीय व इतर सर्व शासकीय यंत्रणांवर अकारण ताण पडत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे शहरातील सर्व पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी घेतला आहे.
धुळ्यात कोणते पूल बंद?
धुळे शहरातील गणपती पूल, श्री कालिकामाता मंदिराजवळील पूल, लहान पूल व मोठा पूल अत्यावश्यक सेवा वगळता सार्वजनिक वापरासाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यादव यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले, की कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यात राज्यात गेल्या १३ मार्चपासून साथरोग अधिनियमाची अंमलबजावणी सुरू आहे. कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार धुळे जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये २२ एप्रिल ते १ मे सकाळी सातपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा