राजकीय गोंधळानंतर ‘मी पुन्हा येईन’चे ‘ते’ Tweet डिलीट..!
मागील विधानसभा निवडणुकांपासून राज्यातील राजकारणात उलथापालथी थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशातच आता याच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होतोय की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. निमित्त होते ते भाजप महाराष्ट्रच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्वीटर) हॅंडलवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन हे वाक्य असलेला व्हिडीओ ट्वीट करण्याचे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारणात गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाच्या एका तासानंतर भाजप महाराष्ट्राने ते ट्वीट डिलीट केले आहे. परंतू या ट्वीटमधून कुणाला काय सांगायचे होते किंवा काय संदेश पोहोचवायचा होता ते साध्य झाले का? अशी चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात रंगत आहे.
आज महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत दिले. ‘महाराष्ट्राच्या निवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन’ अशा आशयाचा देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ भाजपच्या महाराष्ट्राच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आले होते.
2014 मध्ये केंद्रातील भाजपने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ विदर्भातील (नागपूर) देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात टाकली होती. यावेळी भाजपसोबत सत्तेत शिवसेना होती. 2014 ते 2019 असे सलग पाच वर्ष फडणवीसांनी मुख्यमंत्री पद उत्तमरित्या सांभाळले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे म्हटले होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत 105 जागा जिंकूनही भाजप सत्तेबाहेर राहले होते. त्यानंतरचे सगळे राजकारण आपण पाहले आहे.
सध्या राज्यात शिंदेची शिवसेना, अजित पवारांचा गट आणि भाजप अशा तीन पक्षांचे सरकार आहे. या तिन्ही पक्षात कधी जाहिरातीवरून तर कधी पालकमंत्री पदावरून कुरघोडी सुरू असते. अशातच गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर असताना तिन्ही पक्षांचे नेते तेथे हजर होते. मात्र, पंतप्रधानांचा दौरा संपत नाही तोच आज भाजप महाराष्ट्रने देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनचा व्हिडीओ व्हायरल केला होता. या व्हिडीओमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. शिंदेच्या शिवसेनेतील मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांपुढे येत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. या सगळ्या गोंधळानंतर भाजप महाराष्ट्रने ते ट्वीट डिलीट केले आहे.



