धरणगावात अज्ञाताने आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले !
धरणगाव (झूम मराठी) माजी मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव ग्रामीणच्या शिवसंवाद दौऱ्यावर येत आहे. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत बॅनर लावण्यात आले आहे. मात्र धरणगावात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री उघडकीस आल्यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
गेल्या काही दिवसापूर्वी प्रकृती अस्वास्थामुळे आदित्य ठाकरे यांचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द झाला होता. मात्र, आज ते जिल्हा दौऱ्यावर येत आहे. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. यात दुपारी १-०० वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवा सेना कडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत.
मात्र, आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने प्रवेश होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर मध्यरात्री काही अज्ञातांकडून फाडण्यात आले आहे. जवळपास सहा ते सात ठिकाणी हे बॅनर फाडण्यात आल्याचे कळतेय. द्वेष भावनेतून शिवसेना, युवासेनेचे स्वागत फलक (बॅनर) फाडल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला असून, या घटनेमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.



