कल्याण – ठाकुर्ली रुळावरून चालताना तान्हुले बाळ हातातून निसटले अन् थेट नाल्यात वाहून गेले..
कल्याण – ठाकुर्ली दरम्यान एक 4 महिन्यांचे तान्हुले वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पीडित महिला आपल्या काकांसोबत लोकलमधून उतरून रेल्वे रुळावरून चालत जात होती. बाळ तिच्या काकांच्या हातात होते. ते त्यांच्या हातातून निसटले अन् थेट वाहत्या नाल्यात पडून वाहून गेले. या घटनेप्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंबरनाथ लोकल ठाकुर्ली ते कल्याण या दरम्यान सुमारे 2 तास उभी होती. त्यामुळे काही प्रवाशी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते. त्यात एक छोटेसे बाळ घेऊन एक महिला व तिचे काका चालत होते. त्यावेळी अचानक त्या काकांच्या हातून 4 महिन्यांचे बाळ निसटले आणि थेट नाल्याच्या पाण्यात जाऊन पडले. काही क्षणांतच हे बाळ नाल्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली.
घटनास्थळी आईचा आक्रोश
काही तरुणांनी लगेचच नाल्याच्या दुसऱ्या बाजूने धाव घेत बाळाचा शोध घेतला. पण ते सापडले नाही. दुसरीकडे, पीडित मातेच्या आक्रोशाने अनेकांच्या डोळे पाणावले. रेल्वे पोलिस वाहून गेलेल्या बाळाचा शोध घेत आहेत.


