प्रेरणादायी! तब्बल १२ किलोमिटर उन्हात ‘चालत’ जाऊन ६५ वर्षीय आजोबांनी घेतली लस
झूम मराठी न्यूज वेब मीडिया
लातूर, वृत्तसेवा | एकीकडे आपण कोरोना विषाणूची लस घ्यायला नकार देतो तर काही ठिकाणी वृद्ध लोक लस घेण्यासाठी आपला जीव पणाला लावताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातील उस्तुरी येथील एका ६५ वर्षीय आजोबांनी तब्बल १२ किलोमिटर पायी चालत जाऊन लस घेतली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी लस अत्यंत महत्वाची असल्याचे आजोबांकडून संदेश मिळत आहे.
उस्तूरी येथील रहिवासी असणारे महादेव मंदाडे इच्छाशक्ती असेल तर मानव काहीही करू शकतो, हे पुन्हा सिद्ध केले आहे. उस्तुरी ते कासार बालकुंदाचे अंतर तब्बल १२.१ किलोमिटर आहे. कासार बालकुंदा येथे कोरोना पासून वाचविणारी लस मिळते हे ६५ वर्षीय आजोबांना समजले.
जाण्यासाठी वाहन नसल्याने त्यांनी काठीचा आधार घेत भर उन्हात तब्बल १२ किलोमिटर अंतराचा रस्ता सर केला आणि कोरोणापासून वाचविणारी लस घेतली. त्यांच्या या इच्छाशक्तीपुढे आज सोशल मीडिया झुकले असल्याचे दिसत आहे. सध्या ते सोशल साईट्सवर चर्चेत आहेत.


