मनमाड – किसान सभेचा रस्ता रोको कांद्याला 3 हजार रुपये हमीभाव मागणी करत, रस्त्यावर कांदे फेकत शेतकऱ्यांचे आंदोलन
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
मनमाड (मुक्ताराम बागुल) केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याच्या भावात सतत घसरण होत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली काल शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढत मनमाड – चांदवड राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शनिवारी दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर संतप्त झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत चांदवड – मनमाड महामार्गाकडे जाऊन रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.
महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या कांदा पिकास अत्यंत तुटपुंजा भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. अशी परिस्थिती असतानाही राज्य व केंद्र सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क भरमसाठ वाढवली आहेत. याचाही परिणाम कांदा दरावर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकास तीन हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळावा, नारपारच्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करावा, वन व गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करावी, ओला दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के पिक विमा रक्कम त्वरित मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी विजय दराडे, त्र्यंबक ठाकरे, शांताराम दळवी, नवनाथ दळवी, सोमनाथ पवार, शिवाजी गोसावी, गोरख फोडसे, संतोष बोदडे, तुकाराम पिंगळे, तात्यासाहेब पानसरे, विष्णू गायकवाड, शांताराम लोखंडे, पंढरीनाथ पवार, रामभाऊ पिंगळे, कमळाबाई ठाकरे, शालिनी ठाकरे, द्वारकाबाई तांबे, भिकुबाई मोरे आदिंनी आंदोलन केले.



