आपल खान्देशआरोग्य व शिक्षण
पाचोऱ्यात बेड, इंजेक्शनसाठी नातेवाइकांच्या विनवण्या!!
रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात बेड आणि रेमडेसिव्हिर या इंजेक्शन व्हायलसाठी मेडिकलवर व फोनद्वारे विनवणी करताना आढळले
- झूम मराठी न्यूज वेब मीडिया
पाचोरा Live 24
दिलीप परदेशी मुख्य संपादक
पाचोरा (जळगाव ) : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातून अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या व्हायलचा शोध घ्यावा लागत आहे. यातून दिवसभरात रुग्णांचे नातेवाईक शहरातील अनेकांना फोन करून ‘कोणी बेड देता का, कोणी इंजेक्शनची व्हायल देता का?’ अशी आर्त विनवणी करीत आहेत.

पाचोरा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन व्हायलचा शोध घ्यावा लागत आहे. यातून दिवसभरात रुग्णांचे नातेवाईक शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती व पत्रकारांना फोन करून ‘कोणी बेड देता का, कोणी इंजेक्शनची व्हायल देता का?’ अशी आर्त विनवणी करीत आहेत. रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात बेड आणि रेमडेसिव्हिर या इंजेक्शन व्हायलसाठी मेडिकलवर व फोनद्वारे विनवणी करताना आढळले. कोविड सेंटरला मागणीपेक्षा कमी इंजेक्शन मिळाल्याचे समजते. त्यामुळे आजही या इंजेक्शनच्या शोधासाठी नातेवाईक आकाशपातळ एक करताना दिसत आहेत.

प्रशासनाने पाचोरा शहरातील शासकीय व खाजगी कोविड सेंटरमध्ये रिक्त असलेले साधारण व आॕक्सिजनयुक्त बेड आणि प्रत्येक सेंटरला रेमडेसिव्हिरच्या किती व्हायल दिल्यात याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज सकाळी देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाचोरा तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्काराची संख्या मोठी आहे. याव्यतिरिक्त दफन केलेले तसेच ग्रामीण भागात व अन्य शहरात उपचाराअंती मृत झालेल्यांची आकडेवारी प्रशासकीय दप्तरी नसल्याने कोरोनाची तीव्रता अद्याप प्रशासनात दिसून येत नाही. कोरोना विस्फोटाला बहुतांश नागरिक अन् प्रशासनाची दिरंगाईच कारणीभूत असल्याची चर्चा आहे.



