सुषमा अंधारे या अंधारातसुद्धा दिसत नव्हत्या ; बंडखोर आमदारांमुळे ओळख निर्माण..
जळगाव : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare )या नेहमी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीका करतात. अशातच शिंदे गटातील पाचोरा भडगाव मतदार संघांचे आमदार किशोर पाटील (Kishore Patil) यांच्या जळगाव या मतदारसंघात अंधारे यांची सभा होणार आहे. त्यावरून आमदार किशोर पाटील यांनी माध्यमांसमोर संवाद साधताना अंधारेंवर टीका केली. “सुषमा अंधारे या अंधारातसुद्धा दिसत नव्हत्या. त्यांनी शिंदे गटातील आमदारांचे आभार मानले पाहिजे. बंडखोर आमदारांमुळे महाराष्ट्राच्या जनतेला सुषमा अंधारे यांनी ओळखले.” असे ते म्हणाले.
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, “सुषमा अंधारे यांना शिंदे गटातील आमदारांच्या बंडखोरीआधी महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हते. सुषमा अंधारे यांनी ४० बंडखोरांचे मनापासून आभार मानले पाहिजे. मागच्या तीन महिन्यांपूर्वी सुषमा अंधारे या अंधारातसुद्धा दिसत नव्हत्या. परंतु आम्ही बंड केल्यामुळे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अंधारेताई कोण आहेत? हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती पडल्यामुळे सुषमा ताईंनी आभार मानले पाहिजे, की आम्ही बंड केले नसते, तर महाराष्ट्राच्या जनतेने अजूनही अंधारे ताईंना ओळखले नसते.” असे म्हणत जळगावातील सभेसाठी सुषमा अंधारे यांचे मी मनापासून स्वागत करेन, असेही ते म्हणाले. जनतेचे आशीर्वाद असतील तर मला मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.




