बाण रुताला काळजात, मशाल पेटणार महाराष्ट्रात..
विशेष प्रतिनिधी उदय नरे,
राज्यातील सर्वांत मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. ठाकरेंनी त्रिशुळ आणि उगवता सूर्य चिन्ह मागितलं होतं. पण निवडणूक आयोगाने उपलब्ध चिन्हांच्या यादीत ही चिन्हं नसल्याने संबंधित चिन्हं देण्यास ठाकरेंना नकार दिला. तर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे चिन्हासाठी पर्याय मागितले आहेत. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून तीन नवे पर्याय देण्यात आले होते. ठाकरे गटाने आपल्या पक्षासाठी ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘मशाल’ या निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. तर नव्या पक्ष नावासाठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ व ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ ही नावे नोंदणीसाठी दिली होती
राज्यातील अनेक जिल्हात शिवसैनिकांनी मशाल पेटवून नव्या चिन्हाचे स्वागत केले आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे यात सर्व काही आले आहे आता शिवसैनिक मशाली सारखे पेटून उठतील आणि राज्यात शिवसेनेचा झंझावात घेऊन येईल अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.




