जळगाव पोलिसांची मोठी कारवाई, नशिराबाद टोल नाक्यावर बोगस पावत्या देऊन लूट करणाऱ्यांचा पर्दाफाश!
पोलीस अधिक्षकांच्या पथकाने साध्या वेशात धाड टाकून टोलनाक्यावरील बोगस पावत्या देऊन वाहनधारकांची लूट करणाऱ्यांचा पर्दाफाश केला..
झूम मराठी वृत्त
जळगाव जिल्ह्यातील नशीराबाद टोलनाक्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. या पथकाने साध्या वेशात धाड टाकून टोलनाक्यावर बोगस पावत्या देऊन वाहनधारकांची लूक करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी तक्रार केल्या नंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी टोलनाका मॅनेजरसह पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन मशीन जप्त करण्यात आल्या आहेत.

आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी महामार्गावरील नशीराबाद टोलनाक्यावर वाहनधाकांना बनावट पावत्या देण्यात येवून शासनाची फसवणूक केली जात असल्याची तक्रार पोलीस विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या विशेष पथकाने गुरुवारी टोलनाक्यावर छापा टाकला. साध्या वेशातील पोलीस पथक वाहनधारक बनून गेले. यावेळी टोल नाक्यावर पैसे दिल्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या पावत्या बनावट असल्याचं लक्षात आले. त्यामुळे पथकाने कारवाई केली.




