ब्रेकिंग

चहावाला पंतप्रधान आणि रिक्षावाला मुख्यमंत्री…

पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्याने एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन सुपरस्टार देखील ठरू शकतात..



झूम मराठी संपादकीय..

मागील दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजमाध्यमांवर आणि यत्र, तत्र सर्वत्र जे काही चालले आहे ते आपण सगळे बघतो आहोत. दहा दिवसांत जर मराठी माध्यमे कुणी काबीज केली असतील तर राजकीय विश्लेषक, कायदेतज्ञ आणि निरीक्षकांनी. शेवटी भाजपच्या धक्कातंत्राने कुणालाच कशाचाच पत्ता लागू दिला नाही आणि ठाण्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी बसवले गेले. फडणवीसांचे नेमके काय झाले त्यांची पदावनती झाली की ते दिल्लीच्या राजकारणाला बळी पडले की अजून काही याचंही विश्लेषण अनेक मान्यवरांनी केलं.

 एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री होणे आणि 11 तारखेनंतर जर त्यांचे मुख्यमंत्री पद टिकले तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक राज्यव्यापी सत्ताकेंद्र तयार होईल ज्याचं नाव असेल एकनाथ संभाजी शिंदे.

राजकारणाच्या बातम्या म्हटलं की रोज तीच तीच आडनावं ऐकून आणि वाचून कंटाळा आलेल्या माझ्यासारख्या तरुणांना आता एक नवीन, तुलनेने सामान्य आणि संघर्षातून वर आलेले नाव वाचायला आणि त्याबद्दल लिहायला मजा येईल हे मात्र नक्की.

महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याचा विचार करत असतांना प्रस्थापितांचेच वारसदार डोळ्यासमोर यायचे ज्यामध्ये रोहित पवार, आदित्य ठाकरे, सुजात आंबेडकर आणि अजून काही घराणेशाहीचे प्रॉडक्ट आता आपले भविष्य ठरवतील आणि मतदार देखील डोळे झाकून त्यांचे झेंडे उचलतील असे निराशाजनक चित्र डोळ्यासमोर होते पण आता एकनाथ संभाजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्याने एखादा नवीन माणूसही यामध्ये मोठ्या मुत्सद्देगिरीने येऊ शकतो, स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतो आणि प्रस्थापित, बलाढ्य राजकीय घराण्यांना हादरवून टाकू शकतो ही अत्यंत दिलासादायक बाब यानिमित्ताने समोर आली आहे.

चहावाला पंतप्रधान आणि रिक्षावाला मुख्यमंत्री,

एकाच घटनेकडे, एकाच वाक्याकडे दोन दृष्टिकोनातून पाहणाऱ्या आपल्या समाजात स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या कैकपटीने अधिक आहे. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री होणं हे अनेक मध्यमवर्गीय तरुणांना स्वप्न दाखविणारं किंबहुना त्यांच्या मनात अनेक राजकीय इच्छा आकांक्षा रुजविणारं आहे हे नक्की.

एकनाथ शिंदे 11 वी पास आहेत,

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 11 वी पास आहेत यावरही दोन प्रतिक्रिया प्रामुख्याने आढळून आल्या. उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या अधिक असल्याने अनेकांना आता 11 वी पास माणसाच्या हातात राज्याची धुरा जाणार या गोष्टीची चिंता वाटायला लागली आहे तर ज्या लोकांना आपल्या शिक्षणव्यवस्थेची खरी माहिती आहे, कशापद्धतीने पदव्या मिळविल्या जातात हे माहिती आहे आणि खूप शिकूनही शिक्षणाच्या जोरावर नाही तर अंगभूत कौशल्याच्या आधारावर ज्यांनी आयुष्यात यश मिळविले आहे अशा लोकांना एकनाथ शिंदेंचे 11वी पर्यंतचे शिक्षण हा मुद्दाच मुळात गौण वाटतो.

अर्थात शिंदेंची कारकीर्द कशी असेल याबद्दल कुठलंही भाकीत करणार नाही. आपल्याला त्यांच्याकडून फारशा अपेक्षाही नाहीत कारण ही दुधारी तलवार ठरू शकते. प्रचंड भ्रष्टाचार , बेबंदशाही आणि इतर सगळ्या वाईट गोष्टी बोकाळू शकतात किंवा पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्याने एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन सुपरस्टार देखील ठरू शकतात…..

एकनाथ संभाजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना या नवीन इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा!!!!



बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे