मोठी बातमी: एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदाराला हृदयविकाराचा झटका!
झूम मराठी
शिवसेनेचे अकोल्यातील बाळापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार नितीन देशमुख हे सध्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये आहेत. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३० ते ३५ आमदार असल्याचं बोलंलं जातयं. यामुळे राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण आहे. अशात शिवसेनेच्या आमदाराला हृदयविकाराचा झटका आल्याने अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या तब्येतीच्या तक्रारीनंतर त्यांना सुरतच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा हॉटेलमध्ये आणण्यात आले. ते शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे हे पक्षात नाराज आहेत. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल ३० ते ३५ आमदार सुरतमधील एका हॉटेलात थांबले आहेत.
आमदार नितीन देशमुख हे जानेवारी २०२२ मध्ये चर्चेत आले होते. यावेळी तहसीलदार कोटकर यांनी हे पत्र बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात लिहीले होते. प्रभारी तहसीलदार योगेश कोटकर यांनी जिल्हाधिकारी यांना लिहलेल्या तक्रारीत आमदार देशमुख यांच्या विरोधात राजकीय दबावाचा पाढा वाचला होता.



