अंमळनेर – अधिकारी गावकऱ्यांसोबत बसलेत जमिनीवर! मनं जिंकली..
अमळनेर (झूम मराठी) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका कार्यक्रमात आयएएस, आयआरएस अधिकारी खुर्ची, मानपान, सत्कार सोडून चक्क जमिनीवर मांडी घालून बसलेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. अन् नेटीजन्स ‘डोक्यात हवा गेलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनी या आदर्श अधिकाऱ्यांकडून बोध घ्यावा’ असा सल्ला देत आहेत.
ताडे (ता. एरंडोल) येथे काही दिवसांपूर्वी लोकचळवळीतून जलसंधारणबाबत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला आशिया खंडातील सर्वात मोठ्या व श्रीमंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, ईडी (सक्तवसुली संचालनालया)चे सहआयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार असे प्रशासनातील तीन उच्च अधिकारी गावात येणार होते, यासाठी म्हणून गावकरी कमालीचे उत्साहात होते. कार्यक्रमाला आलेले गावकरी खालीच सतरंजीवर बसले होते पण, त्यांनी या अधिकाऱ्यांसाठी टेबल- खुर्ची, हार, फुले, शाली- श्रीफळ याची तयारी केली होती.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, सक्तवसुली संचालनालयचे सहआयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण, उपसंचालक कपिल पवार आलेत. गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. गावकरी खाली बसलेले आहे हे पाहिल्यानंतर आलेले सर्व अधिकारीही त्यांच्यासमोर खाली बसलेत. या अधिकाऱ्यांचा साधेपणाने गावकऱ्यांची मनं जिंकली.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटीजन्सला, पाळीव कुत्र्याला फिरविण्यासाठी स्टेडियम रिकामे करणारे ‘आयएएस अधिकारी दांपत्य’ आहटवले. त्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सोशल मीडियावर ही घटना ट्रोल होत असताना नेटीजन्सने या अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि, या अधिकाऱ्यांच्या साधेपणाचा बोध घ्या, असा सल्ला अधिकाऱ्यांना दिला.


