उर्जामंत्री नितीन राऊत यांचा विधासभेत निर्णय, वीज तोडणी तात्पुरती थांबवण्यात येईल, शेतकऱ्यांना दिलासा दिला
पीक हातात येईपर्यंत पुढील तीन महिने शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्पुरती थांबवण्यात येईल, अशी घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधासभेत केली.
राज्यात मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या वीजतोडणीचा मुद्दा चांगलाच गाजला. प्रकरणावरुन अधिवेशनात आज विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. यानंतर विधानसभेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पीक हातात येईपर्यंत पुढील तीन महिने शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्पुरती थांबवण्यात येईल, अशी घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधासभेत केली.
उर्जामंत्री राऊत यांनी इतर ग्राहकांना वीजबिलांची थकबाकी वेळेत भरण्याची विनंती केली आहे. आम्हाला पॉवरलूम आणि विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना वीज अनुदान द्यावे लागते. महावितरणची ही आर्थिक अडचण लक्षात घेऊन ग्राहकांनी थकीब बिले वेळेवर भरावीत, असे आवाहन नितीन राऊत यांनी केले.
आज मंगळवारच्या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या सत्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. वीज कनेक्शन कापणार नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचे काय झाले, असाव सवाल करत शेतकरी कुणालाही माफ करणार नाही, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला. या प्रश्वावरून विधानसभेत एकच गोंधळ सुरु झाला आणि सभागृहाचं कामकाज दुपारी एक वाजता स्थगित करावं लागलं.


