शिवसेनेचा गिरीश महाजनांना धक्का, भाजपाचे ४ नगरसेवक फोडले
झूम मराठी वृत्त
जळगाव :- जळगाव महापालिकेत भाजपाचे चार नगरसेवक फोडून शिवसेनेने भाजपाचे नेते गिरीश महाजन यांना त्यांच्या प्रभावाच्या क्षेत्रात पुन्हा जबर धक्का दिला. यामुळे शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वजन वाढले आहे. आता महापालिकेत शिवसेनेचे स्पष्ट बहुमत झाले आहे.
भाजपाच्या प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे या ४ नगरसेवकांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावी शिवसेनेत प्रवेश केला. गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
भाजपाच्या या नगरसेवकांना शिवसेनेत ओढण्याच्या कार्यक्रमात सभागृहनेते ललित कोल्हे प्रमुख सूत्रधार होते. त्यांनीच नगरसेवकांच्या प्रवेशाची आखणी केली होती. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनीही या कामी पक्ष स्तरावर सूत्रे सांभाळली.
शहरातील विकास कामांबाबत भाजपाच्या नगरसेवकांची स्थानिक नेतृत्वावर तीव्र नाराजी होती. त्यांना विकासकामांचे आश्वासन दिले आहे. या पक्षांतरात घोडेबाजार झालेला नाही, असा दावा ललित कोल्हे व सुनील महाजन यांनी केला.


