आपल खान्देश

पत्नीच्या काेराेना मृत्यूची 50 हजारांची मदत चाेरट्यांनी पळविली, पाेलीसांनी माणुसकी दाखवित वर्गणी काढून वृध्दाला दिली रक्कम

नंदुरबार पोलीसांची अशीही माणुसकीची मदत,पत्नीच्या काेराेना मृत्यूची 50 हजारांची मदत चाेरट्यांनी पळविली, पाेलीसांनी माणुसकी दाखवित वर्गणी काढून वृध्दाला दिली रक्कम

नंदुरबार : प्रत्येक घटनेकडे सामाजिक भूमिकेतून पाहणारे, चित्रकलेची आवड जोपासणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी पी. आर. पाटील हे सध्या नंदुरबार येथे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सोलापुरात पोलीस उपायुक्त या पदावर जबाबदारी सांभाळली आहे.

माणुसकीच्या भूमिकेतून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका वृद्ध नागरिकाला केलेली मदत खूप काही सांगून जाते

वाचा नेमके काय झाले –

पदम हारचंद कोळी (वय वर्षे ७५ वर्षे, रा.डामरखेडा ता.शहादा) घरी अठराविश्व दारिद्र्य, संजय गांधी निराधार योजनेच्या मदतीवर अवलंबून असलेले जगणे. त्यातच पत्नीस कोरोना झाला.तिच्या कोरोनाच्या उपचाराच्या खर्चामुळे हवालदील झालेला प्रपंच. या साऱ्यामुळे संसाराचा गाडा मोडकळीस आलेला. पत्नी कोरोनातून बाहेर आली नाही.

गतवर्षी ती साथ सोडून निघून गेली.वृद्धापकाळात त्याचे जगणे आणखीच हलाखीचे आणि दर्दभरे झाले. पत्नीच्या कोरोनामुळे निधन झाल्याने शासकीय योजनेतून ५० हजार रु. मंजूर झाल्याचे समजले आणि आयुष्याच्या संध्याकाळी सरकारी मदतीच्या रुपाने आशेचा किरण गवसल्याचा भास झाला.काल धावतच तो प्रकाशा येथील स्टेट बॅंकेत गेला. ते ५० हजार त्याने बॅंकेतून काढून घेतले

पैशाची पिशवी पत्नीच्या आठवणीने ओलावलेल्या डोळ्यांना लावली. घरी परतताना पत्नीच्या आठवणीने गळ्याशी दाटलेला आंवंढा गिळण्यासाठी पाणी पिण्यासाठी एका हॅाटेलवजा टपरीवर थांबला.सरकारी दिलासा मिळाल्याने तो थोडा रिलॅक्स झाला होता. तेवढ्यात चोरट्याने डाव साधला. क्षणात पैशाची पिशवी गायब झाली. आयुष्यात पहिल्यांदा इतके पैसे एकदम पाहिलेले..पण तेही काही क्षणाचेच सोबती. मघाशी अर्धवट गिळलेला हुंदका आता गळ्यातून बाहेर पडला.

आयुष्यातल्या अखेरच्या दिवसात दारिद्र्यासोबत वाट्याला आलेली हतबलता मात्र तशीच गिळून तो नशीबाला दोष देत मार्गस्थ झाला.

आज वृत्तपत्रात बातमी वाचून नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांनी त्याला आपलेसमोर समक्ष हजर करण्याचे शहादा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना फर्मान सोडले. शहादा पो.स्टे.च्या पोलीस गाडीतून त्याला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले गेले.कालच्या धक्क्यातून अद्याप तो सावरेलेला नव्हताच. पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली होती. आता थेट एस.पी.नीच का बोलावले असावे म्हणून तो आणखीच घाबरेलेला होता. तेथे गेल्यावर त्याला आणखी मोठा बसला परंतु हा गोड धक्का होता.

पोलीस अधीक्षकांनी ५० हजार रु. त्याच्या हातात ठेवले.”तुमचे चोरीला गेलेले पैसे आम्ही शोधून देऊच परंतु माझ्या सहकारी पोलिसांनी तुमच्यासाठी वर्गणी काढून पैसे जमवले आहेत त्याचा स्वीकार करा” म्हणून खुद्द एस.पी. नी विनंती केली. पोलिसांनी माणुसकीच्या भावनेतून जमा केलेले पैसे स्विकारताना त्याला रडू कोसळले.एका वृद्धाचे लुटलेले समाधान वर्गणी काढून परत करताना उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनाही गहिवरून आले

नंदूरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधिक्षक विजय पवार,शहाद्याचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे,एल.सी.बी. चे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, वाचक अर्जुन पटले आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या वृद्धास ही मोलाची आणि माणुसकीची मदत करुन पोलीसातील माणुसकीचा परिचय करुन दिला. “आता चार दिवस जास्त जगेन” असे म्हणत तो ७५ वर्षांचा वृद्ध शहादा पो.स्टे.च्या गाडीत स्वतःहून जाऊन बसला. मात्र यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे