सातवे पैकी शिंदेवाडी (कोल्हापूर ता. पन्हाळा) येथे गॅस्ट्रोने थैमान घातले असून चार वर्षांच्या बालिकेसह महिलेचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून आणखी 11 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मृत बालिका आणि महिला धुळे जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील आहेत.
ग्रुप ग्रामपंचायत सातवे पैकी शिंदेवाडीला गाव विहिरीतून पिण्यासाठी पाणी पुरवले जाते. काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांनी या विहिरीजवळ आपली पाले टाकली आहेत. त्यांनी या विहिरीतील पाणी प्यायल्यामुळे तेथील लोकांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. या दरम्यानच गावातील काही ग्रामस्थांनाही उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर सातवे येथील आरोग्य उपकेंद्रात उपचार करण्यात आले. ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील चारवर्षीय बालिका रितू पवार आणि राजश्री पवार (50) यांनाही त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावरही उपचार सुरू होते. पण उपचार सुरू असताना दोघींचाही मृत्यू झाला. दरम्यान, वैद्यकीय विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा