आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा तालुक्यात कारचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण गंभीर जखमी..!

 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात शुक्रवारी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हळदीचा कार्यक्रम आटोपून जळगावकडे परत येणाऱ्या इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृत व जखमी सर्व जळगावमधील पिंप्राळा उपनगरातील रहिवासी आहेत. श्रीरंग सुरेश पाटील (२७) आणि प्रसन्न रवींद्र निमजे (२१, दोन्ही रा. पिंप्राळा, जळगाव), अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. रोहित सोनार (२३), निखिल कच्छवा (२५), अनिकेत कोळी (२२), निलेश वाघ (२३, सर्व रा.पिंप्राळा), अशी गंभीर जखमी तरूणांची नावे आहेत. श्रीरंग पाटील, प्रसन्न निमजे आणि इतर पाच तरूण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथे गुरूवारी सायंकाळी हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यावर घराकडे परत येत असताना शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास पाचोरा–जळगाव रस्त्यावरील बिल्दी फाट्याजवळ अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव कार थेट रस्त्याच्या कडेला दोन ते तीन वेळा पलटी झाली.

अपघातात श्रीरंग सुरेश पाटील आणि प्रसन्न रवींद्र निमजे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या श्रीरंग पाटील याचे दोन महिन्यांपुर्वीच लग्न पार पडले होते. जखमींपैकी काही तरूणांवप पाचोरा येथे उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी रोहित सोनार यास जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की इनोव्हा कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, महावितरणचा पोलही कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव तसेच पाचोरा येथे हलविण्याची व्यवस्था केली. तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात रवाना केले. या घटनेमुळे जळगावमधील पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे