मनपा निवडणुकीच्या तोंडावर आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, बलात्काराचा गुन्हा दाखल
झूम मराठी
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रिव्हॉल्व्हर दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे संबंधित महिलेने तक्रार दिली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र महिला आयोगाने नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिले. त्यानंतर नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत या महिलेने म्हटलं आहे की, गणेश नाईक यांनी माझ्यासह माझ्या १५ वर्षीय मुलाला ठार मारण्याची धमकी दिली आहे. आमदारांच्या कार्यकर्त्यांपासून आमच्या जीवाला धोका आहे. गणेश नाईक आणि आपण १९९३ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. आम्हाला १५ वर्षांचा मुलगा आहे. आता माझा मुलगा मोठा झाल्याने त्याला संबंधित आमदाराच्या इतर मुलांप्रमाणेच मालमत्तेत समान वाटा मिळावा. मुलाला पितृत्वाचा अधिकार मिळावा, आणि वैवाहिक अधिकार मिळावेत, यासाठी मी सतत नाईक यांच्याकडे तगादा लावला होता; परंतु आमदार नाईक यांनी लग्नाचे आमिष आणि जीवे मारण्याची धमकी देऊन माझे लैंगिक शोषण केले. त्यांच्या धमक्यांमुळे त्यांच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मला रहावे लागले. गणेश नाईक यांचा मुलगा संदीपनेही मला नाईक यांच्याशी असलेले संबंध सोडून जाण्यास सांगितले. तसेच मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असाही आरोप या महिलेने केला आहे.



