क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

सचिन तेंडुलकरचे ‘दादोजी कोंडदेव स्टेडियम’वर चौकार, षटकार

सचिन तेंडुलकर अचानक ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दाखल, नव्या खेळपट्टी व आऊटफिल्डचे केले कौतुक


शरण खन्ना

ठाणे : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अचानक ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दाखल झाला. त्याने पॅड्स बांधले, हेल्मेट चढवले आणि तुफान फटकेबाजी करत क्रीडा रसिकांचीही मने जिंकली. मात्र कोणत्याही क्रिकेट सामन्यात सचिनने ही फलंदाजी केली नसून क्रिकेट अकादमीच्या एका डॉक्युमेंट्री शूटसाठी सचिनने मैदानात पाऊल ठेवले. यावेळी नूतनीकरणादरम्यान नव्याने तयार करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या खेळपट्टी आणि या मैदानाच्या आऊटफिल्डचेही कौतुक केले.

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर तब्बल ३५ वर्षांनी बीसीसीआयच्या अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडकाचे सामने रंगणार आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार महापौर नरेश म्हस्के, आयुक्त डॉ. विपीन शर्मा, नगरसेवक विकास रेपाळे, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदींनी एमसीएच्या सामन्यांसाठी आवश्यक असलेले बदल या मैदानात केल्यामुळे प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील सामने आता या मैदानात होणार आहेत. याच शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आज सचिन तेंडुलकरने ‘दादोजी कोंडदेव’वर लावलेल्या हजेरीने खोवला आहे. सचिन तेंडुलकर याची नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियम येथे क्रिकेट अकादमी आहे. त्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी सचिनने दादोजी कोंडदेव स्टेडियमची निवड केली होती. याठिकाणी त्याने जोरदार फटकेबाजी केली. तसेच स्टेडियमच्या नव्या लूकचे कौतुक केल्याची माहिती क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी दिली. यावेळी ठाणे पालिकेच्या क्रीडा विभाग आणि स्टेडियममधील कर्मचाऱ्यांसोबत सचिनने फोटोसेशन करत त्यांनाही सुखद धक्का दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे