राज्यभरात शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार – जयंत पाटील
कर्नाटकाची राजधानी बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची सदाशिवनगर बंगळूर येथे विटंबना करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ वरून कोल्हापूरात शिवप्रेमींचा संताप अनावर झाला आहे. शिवप्रेमी कडून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल घोषणा केली कि, आज महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्या सर्व ठिकाणी महाराजांना दुधाचा अभिषेक घातला जाईल.
कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या, दिनांक १९ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 18, 2021
जयंत पाटील म्हणाले कि, कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक १९ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील, असे जयंत पाटील म्हणाले.
विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बंगळुरुतील एक चौकतील हा पुतळा आहे, त्याची गुरूवारी रात्री विटंबना केली, त्याचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.



