माझ्याकडे सोन्यासारखी लोकं, त्यांच्याकडे गद्दारीचे खोके – अमोल शिंदे
पाचोरा (झूम मराठी ऑनलाईन) भारतीय जनता पार्टी आयोजित खडकदेवळा -लोहटार गट व कुऱ्हाड गणाचा कार्यकर्ता मेळावा ता. 19 रोजी, सकाळी 11 वाजता रामदेव लॉन्स, पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला.
हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. या मतदारसंघातील निष्ठावंत जनता व कार्यकर्ते गद्दाराला धडा शिकवतील. मतदार संघात 3 हजार कोटींचा विकास केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कोणाचा, आणि कुठे -कुठे कसा विकास झाला? हे जनता आता ओळखून आहे, असा टोलाही अमोलभाऊ शिंदे यांनी लगावला. मागील निवडणुकीत मला छीचोरा मुलगा म्हणत 10 हजार मतांचे गणित याच आमदारांनी मांडले होते. येथील जनतेने मला 75 हजार मते मिळवून दिले, कारण माझ्याकडे सोन्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, तर गद्दाराकडे विकत घेतलेले ठेकेदार आहेत. या निवडणुकीत येथील जनता एक लाख मते माझ्या झोळीत टाकल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास अमोलभाऊ शिंदे यांनी मेळाव्याला बोलताना व्यक्त केला.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात झाली. व्यासपीठावर भाजपाचे पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्र निरीक्षक व गांधीनगर चे उपमहापौर प्रेमसिंग गोल, भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश बापू शिंदे, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलाल जैन, भाजपा व्यापारी जिल्हाध्यक्ष रमेश शेठ वाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, माजी पंचायत समिती सभापती बन्सीलाल बापू पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, भटक्या विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष अरुणकाका पवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष परेश पाटील, तालुकाध्यक्ष करण पवार, छत्रपती ग्रुप चे जिल्हाध्यक्ष भूषण पाटील, सुधाकर अहिरे, दिवाकर वाघ, भाजपा शहराध्यक्ष दीपक माने, तालुका सरचिटणीस मुकेश पाटील, शहर सरचिटणीस जगदीश पाटील, संदीप बोरसे, योगेश माळी, शरद अण्णा पाटील, समाधान मुळे, योगेश चौधरी, दादाभाऊ बोरसे, एम. डी. पाटील, किरणजी पांडे, प्रवीण पाटील, ज्योतीताई भामरे, आदी गटप्रमुख, गणप्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
मेळाव्याला बन्सीलाल बापू पाटील, देवीलाल पाटील,अरुण पवार व मुकेश पाटील यांनी संबोधित केले. उपस्थित मान्यवरांच्या मनोगतून विद्यमान आमदाराच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले. विरोधी पदाधिकाऱ्यांना विकत घेण्याची प्रवृत्ती, विरोधकांना त्रास देण्याची वृत्ती, विरोधी कार्यकर्त्यांचा छळ, वाढती गुंडगिरी, अवैध धंदे, दहशतीचे राजकारण यावर जोरदार शब्द प्रहार करण्यात आले. अमोल शिंदे यांनी आपल्या 40 मिनिटाच्या मनोगतात आमदाराला खुले आव्हान दिले. केवळ राजकारणासाठी पैसा आणि पैशासाठी राजकारण करणाऱ्या आमदाराने पीक विम्याचे प्रकार व निकष यावर अभ्यासपूर्ण बोलून दाखवावे, असे आव्हान दिले. अमोल शिंदे यांनी मागील पाच वर्षात जनतेसाठी केलेली विविध कामे, सामाजिक उपक्रम,योजना , शेतकऱ्यांसाठी केलेली आंदोलने, विद्यार्थी, महिला व सामाजिक हितासाठी केलेली कामे, मेळाव्यातील जनतेसमोर मांडली. पाचोरा-भडगाव मतदार संघात परिवर्तनाची लाट असून जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आपल्याला मिळत आहे. ताईकडे कार्पोरेट कार्यकर्ते, तर गद्दाराकडे ठेकेदार असून माझ्याकडे जीवाला जीव देणारे सोन्यासारखे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांच्या बळावरच आपला विजय निश्चित होणार असा दृढ विश्वास अमोल शिंदे यांनी व्यक्त केला. मुकेश पाटील यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले तर परेश पाटील यांनी आभार मानले.
मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाप्रमुख तथा खडकदेवळा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य, शेख आरिफ शेख इस्माईल, चिंचखेडा येथील शिवसेनेचे उपसरपंच श्रीराम पाटील, अरुण पाटील, वडगाव (आंबे) येथील शिवसेनेचे संतोष निकम, सतीश निकम, कोकडी येथील रणजीत मदन जाधव, बळीराम भाऊ जाधव, संजय जाधव, देविदास राठोड यांनी आपापल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.



