आघाडी सरकारचा निर्णय, महात्मा फुलेंच्या फुलेवाड्याचा होणार विकास; १०० कोटींची तरतूद
झूम मराठी
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प घोषित करत आहेत. महाराष्ट्राचे अधिवेशन सुरु असून कोरोना काळानंतरचा हा अर्थसंकल्प असल्यानं या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मुख्य घोषणा केल्या आहेत. यातील एक महत्वाची घोषणा म्हणजे पुणे येथील फुले दाम्पत्याचा निवासस्थान असलेला फुले वाड्याचा विस्तार होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पातून १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, ही घोषणा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांचा १२५ वा स्मृतीदिन नुकताच झाला आहे. यानिमित्त पुणे येथील फुले दाम्पत्याचा निवासस्थान असलेला फुले वाड्याचा विस्तार करण्यात येणार आहे. राज्य संरक्षित वारसा स्थळ असलेल्या या स्मारकाचा विस्तार होणार असून यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, यावर्षी राजर्षी शाहू महाराजांची १०० वी पुण्यतिथी असून कृतज्ञता पर्व म्हणून हे वर्ष साजरं केलं जाणार आहे. त्यामुळे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राजगडच्या पायथ्याला असलेल्या पालखुर्द इथे छत्रपती संभाजीराजेंच्या मातोश्री सईबाई्ंच्या स्मृतीस्थळाच्या परिसर विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.



