कोरोना माहामारीच्या काळात रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची सर्रास लूट केली जात आहे. रुग्णांच्या कुटुंबीयांकडून घेतलेली आगाऊ रक्कम परत मिळण्याच्या मागणीसाठी रुग्णांचे नातेवाईक, तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांकडून रुग्णालयात एक अनोखे आंदोलन करण्यात आले.
नाशिक : कोरोना माहामारीच्या काळात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची सर्रास लूट केली जात आहे. शहरात रुग्णांच्या कुटुंबीयांकडून घेतलेली आगाऊ रक्कम परत मिळण्याच्या मागणीसाठी रुग्णांचे नातेवाईक, तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांकडून रुग्णालयात कपडे काढून एक वेगळ्याच प्रकारचे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे फेसबुक लाइव्ह (Facebook Live)करत वोक्हार्ट रुग्णालयाच्या कारभाराचा विरोध करण्यात आला. दोन्ही आंदोलकांना मुंबई नाका पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.
वडाळा नाका परिसरातील वोक्हार्ट रुग्णालयात अमोल जाधव याच्या कुटुंबीयांवर उपचार सुरू होते. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आल्यानंतर जाधव याने रुग्णालयात सुमारे दीड लाखाची रक्कम आगाऊ भरली होती. उपचाराचे बिल मेडिक्लेममधून वर्ग केल्यानंतर आगाऊ रक्कम परत मागण्यासाठी रुग्णालयात गेले असता, रुग्णालय प्रशासनाने केवळ एक लाख १२ हजार रुपये देणार असल्याचे सांगितल्याचा आरोप आंदोलकांनी केला. बिलाची संपूर्ण रक्कम भरणा केल्यावर आगाऊ रक्कम का कापली जात आहे, याची विचारणा केली असता त्यांनी विविध प्रकारची कारणे दिली. याचा विरोध करत जितेंद्र भावे, अमोल जाधव यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर कपडे काढून आंदोलन केले. त्यामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा