‘या’ दिवशी पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार, बंडखोरांच्या मतदारसंघात जाणार.
झूम मराठी वृत्त
शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. विशेषतः बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ते सभा घेत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचे दोन टप्पे पार पडले आहेत. त्यांच्या सभांनादेखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर क्रांतिदिनी म्हणजेच ९ ऑगस्टपासून त्यांच्या शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला जळगाव ग्रामीण मधून अर्थात पाचोरा येथून सुरुवात होणार होती. मात्र काही तांत्रिक कारणास्तव त्यांची शिव संवाद यात्रा पुढे ढकलण्यात आली होती. आता त्यांच्या जळगाव ग्रामीण दौऱ्याची तारीख निश्चित झाली आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी जळगावातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात त्यांची तोफ धडाडणार आहे.
शिंदे गटात सामील झालेल्या जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तीन आमदारांच्या मतदारसंघातच त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा मेळावा होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा जळगाव जिल्ह्यातील आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये जळगाव ग्रामीण (धरणगाव तालुका) मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील, पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील, एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील, चोपडा मतदारसंघाच्या आमदार लता सोनवणे, मुक्ताईनगर मतदारसंघाचे अपक्ष मात्र शिवसेनेसोबत असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे.



