महाराष्ट्र

अफजल खान कबरीजवळील अतिक्रमणावर अखेर हातोडा, शिवप्रतापदिनी कारवाई 


प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमणावर गुरुवारी प्रशासनाचा हातोडा पडला आणि चर्चांना एकच उधाण आले. आजच्याच दिवशी 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. अगदी याच तारखेला अफजल खानाच्या कबरीजवळचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली. हा योगायोग नसून ठरवून नियोजनपूर्वक काम असल्याची चर्चा रंगली आहे.

प्रतापगडावर सुरू असलेल्या कारवाईबाबत राज्य सरकार व सातारा जिल्हा प्रशासनाने गुप्तता बाळगली. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाच्या बैठका झाल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी होऊ नये याचकरिता ही खबरदारी घेण्यात आल्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. आम्ही हे ठरवून केलेले नाही. आजच्या तारखेचा योगायोग नसून, उच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिलेला आदेश पाळत हे पाडकाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अफजल खानाच्या कबरी भोवतीचे बांधकाम पाडणे हा विषय एकदम संवेदनशील आहे. यामुळे पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळत ही कारवाई केली. जिल्ह्यातून पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला होता. मध्यरात्रीपासूनच पोलिसांचा कडेकोट पहारा या ठिकाणी ठेवण्यात आला होता. अफजल खान वधाच्या आजच्या ऐतिहासिक दिवशी ही कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वीच्या सरकारांना जे जमले नव्हते, ते एकनाथ िंशदे आणि फडणवीस सरकारने करून दाखवल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

अनधिकृत अतिक्रमण हटवणे योग्यच -देवेंद्र फडणवीस

आजचा दिवस अफझल खानाचा वध झाल्याचा दिवस असून, शिवप्रताप दिवस असल्याने आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासंदर्भात 2007 साली न्यायालयाने निर्णय दिला होता. मात्र, त्यावर आमचं सरकार येईस्तोवर कुठलीही कारवाई झाली नव्हती. उलट ज्या शिवप्रेमींनी आंदोलनं केली तर, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र, अतिक्रमण काढण्याची कारवाई केली गेली नाही. आम्ही 2017 साली पावलं उचलली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या. त्यामुळे पुन्हा हा विषय रखडला. आता सर्व अडचणी दूर करून करुन ही अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जात आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे