उच्चशिक्षित मराठा तरुणाने घेतली बौद्ध धम्म दिक्षा
मुंबई, दि.८ (प्रतिनिधी) पीएचडी करत असलेल्या करण दळवी या उच्च शिक्षित मराठा तरुणाने आज (8-5-2022) मुंबईतील चैत्यभूमी इथं बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. करणने स्वतः विचारपूर्वक हे पाऊल उचलले असल्यामुळे विविध थरातून त्याचं कौतुक आणि स्वागत केलं जात आहे.
जनता दल ( सेक्युलर ) पक्षाचे राज्य महासचिव रवि भिलाणे यांच्या पुढाकाराने हा धम्मदिक्षा सोहळा संपन्न झाला. भारतीय बौद्ध महासभेचे सुनील बनसोडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली भन्ते विशुध्द बोधी यांनी करण दळवी याला धम्म दिक्षा दिली. विलास ढोबळे आणि राजगृह सेवक उमेश कसबे यांनी या कामी मोलाचे सहाय्य केले. धम्म दिक्षा सोहळ्यासाठी रवि भिलाणे यांच्यासह रिपाइंच्या महिला आघाडी राज्य सचिव ममताताई सुरेंद्र अढांगळे, रिपाई कुर्ला तालुका अध्यक्ष अशोक जाधव, महिला आघाडी अध्यक्षा वनिताताई वाघमारे, रवि येडे, भरत वाघमारे, चारुशीला सपकाळे, स्नेहा कांबळे आणि करणची आई तसेच समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी अपर्णा दळवी आदी उपस्थित होते.

धमदीक्षा सोहळ्याआधी करण आणि अपर्णा दळवी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. आनंदराज यांनीही करणच्या निर्णयाचं स्वागत करत त्याला पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.
करणने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पूर्ण केलं असून त्यानंतर पॉलिटिकल सायन्स घेऊन एम ए केलं. सध्या तो पंजाब युनिव्हर्सिटी मधून पीएचडी करत आहे. समाजात समता प्रस्थापित व्हावी म्हणून तो विविध चळवळीतही जमेल तसा सहभाग देत असतो. आपल्या धम्म दिक्षेबद्दल तो म्हणतो, मी आधी तर नास्तिक होतो. मात्र नंतर मला धर्माची गरज वाटू लागली. मी शीख की बौद्ध धम्म अशा विचारात काही काळ घालवला आणि अभ्यासाअंती अखेर बौद्ध धम्म स्वीकारला. या धम्मात नियम नाहीत तर तत्वे आहेत. ते मला अधिक आवडलं.

